सर्व डिजिटल !
– लिहिलेले : अजित हरचेकर
राहुलची तब्येत हल्ली बिघडली होती. कधी छातीत धडधड व्हायची, कधी साखर वाढून चक्कर यायची, जिने चढले की धाप लागायची. सर्दी‑खोकला तर नेहमीच असायचा.
अनेक दिवस असे होत राहिल्यावर शेवटी तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने सर्व नीट ऐकून घेतले आणि रक्त, मूत्र, थायरॉईड, क्रिएटिनिन, ईसीजी, अँजिओग्राफी वगैरे सर्व तपासण्या करून रिपोर्ट आणायला सांगितले.
राहुलने सर्व वाचले. या सर्व तपासण्या करायला बराच खर्च आला असता. त्यातून काही पर्याय निघतो का, याचा तो विचार करू लागला. त्याला एक कल्पना सुचली.
त्याने गुगलवर “माझ्या जवळ असलेली विहीर?” असे शोधले! विहीर त्याच्यापासून दीडशे मीटर अंतरावर होती. मग त्याने दिशा विचारल्यावर कळले की चालत गेल्यास सात मिनिटे लागतील.
त्याने फक्त सीबीसी रक्त तपासणीचा रिपोर्ट काढून घेतला आणि त्याची एक छायाप्रत काढली. ती घेऊन तो विहिरीकडे निघाला. वाटेत त्याला “निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान” असे लिहिलेले बरेच बोर्ड वाचायला मिळाले!
तो जलद गतीने विहिरीजवळ जाऊन तिच्या कड्यावर बसला. त्याने रिपोर्टचा कागद विहिरीत टाकला आणि रडू लागला. बराच वेळ रडल्यानंतर एक जण त्याच्याजवळ आला आणि रडण्याचे कारण विचारले.
राहुलला खात्री झाली की हा माणूस म्हणजे देव आहे आणि मदत करायला आला आहे. राहुलने त्याला मेडिकल रिपोर्ट विहिरीत पडल्याचे सांगितले आणि पुन्हा रडू लागला.
देव म्हणाला, “रडू नकोस, मी तुझा रिपोर्ट काढून देतो.” “मोठे उपकार होतील, देवा,” राहुल म्हणाला.
देव मग विहिरीतून एक रिपोर्ट घेऊन आला आणि राहुलला दिला. तो मूत्र तपासणीचा रिपोर्ट होता. राहुल म्हणाला, “माझा हरवलेला रिपोर्ट हा नाही, हा मला नको!”
देव म्हणाला, “नको तर नको. मला दुसरी कामे आहेत, मी जातो!” त्याने तो मूत्र रिपोर्ट पुन्हा विहिरीत टाकला आणि निघून गेला.
राहुल विचार करू लागला की देव आता पूर्वीसारखा राहिला नाही का? लाकूडतोड्याची गोष्ट खोटी होती का? काय करावे, असा विचार करत असतानाच त्याचा फोन वाजला.
त्याने फोन पाहिला तर त्यावर मेसेज आला होता:
“राहुल, तुझी कल्पना माझ्या लक्षात आली. तुला तुझे सगळे मेडिकल रिपोर्ट्स मोफत हवे आहेत. पण माणसाने स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घ्यायला हवी आणि त्यासाठी पैसे खर्च करायला मागेपुढे पाहणे योग्य नाही. तरीसुद्धा आज तुझ्याकडे पुरेसे पैसे नसल्याने मी तुझे बाकीचे सर्व मेडिकल रिपोर्ट्स तुझ्या ईमेलवर पाठवले आहेत! ते तुझ्या उपयोगी पडतील.
तुझ्या सर्व रिपोर्ट्सचे बिल (एमआरपीपेक्षा १०% कमी) सोबत आहे. पुढच्या तीन महिन्यांत माझ्या खात्यावर ऑनलाईन जमा कर. खाते तपशील दिले आहेत. (तुझ्या एटीएम कार्डचा पिन मला माहित आहे, हे लक्षात असूदे!)
Wish you the best health! आणि एक लक्षात ठेव – ‘बोलण्यानेच सर्व होते!’ पुढच्या वेळी विहीर शोधत राहू नकोस. नुसते मला हाक मार, मग दोन‑तीन जाहिराती ऐकल्यावर मी येईन! (अर्थात, अटी लागू! फुकट काही नाही!)
आता तुमच्याप्रमाणे आम्ही देवही डिजिटल झालो आहोत. कळावे, भक्ती असावी ही विनंती!
(प्रत्यक्ष भेटायचे असल्यास ‘देव @ लाकूडतोड्या विहीर’ असे टाईप करून गुगल मॅप पहावा. भेटण्याची वेळ: संध्याकाळी ५ ते ७. सोबत फुले, हार अथवा नैवेद्य आणू नये.)

लेखक परिचय
अजित वसंत हरचेककर (जन्म : ६ मे १९४४) यांनी २००२ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वास्तुशास्त्र विभागप्रमुख पदावरून निवृत्ती घेतली. व्यावसायिक कारकिर्दीसोबतच त्यांनी साहित्य आणि कलांविषयीची गाढ आवड जपली आहे. त्यांच्या मुलांसाठीच्या कवितांच्या पुस्तकाला मराठा मंदिर साहित्य मंच तर्फे तृतीय पारितोषिक मिळाले आहे.
हरचेककर आजही विविध प्रकारच्या लेखनात सक्रिय आहेत. ते लघुकथा, स्टँड‑अप विनोद, एकांकिका आणि विनोदी लेखन करतात. त्यांच्या लेखनात विनोदबुद्धी आणि सामाजिक निरीक्षण यांचा सुंदर संगम दिसतो, ज्यामुळे ते समकालीन मराठी साहित्यविश्वातील एक वेगळा, ठसठशीत आवाज ठरतात.

